Labels

Tuesday, 27 August 2019



ग्रहांची रचना, मालिका आणि अवकाश
या बद्‌दल माहितीचे कृतीवर आधारित कार्यक्रम

भूमी एनजीओ संपूर्ण भारतभर वस्‍तीपातळीवर, अनाथाश्रमात, विविध सामाजिक संघटना, शाळांमध्ये स्‍वयंस्‍फर्तीने कोणताही मोबदला न घेता शिक्षण प्रसारासाठी काम करते. 

यातीलच काही स्‍वयंसेवक दर शनिवार, रविवारी समता प्रतिष्‍ठानच्या 4 
  अभ्‍यासिकांमध्ये येऊन इंग्रजी, गणित, आर्टून्स, सायन्स असे विषय घेऊन हसत 
   खेळत, कृती कार्यक्रम घेऊन मुलांना विविध विषयातील संकल्‍पना शिकवितात.


                                          

   दि. २ जून २०१९ रोजी अशाच प्रकारे इ. ७ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्‍थ्यांना त्‍यांनी 
   ग्रह आणि त्‍यांची अवकाशातील स्‍थिती याबद्‌दल माहिती दिली. यासाठी मुलांना 
   स्‍वतः विविध ग्रह कागद, थर्माकोल आणि रंगाच्या साहय्‍याने तयार करायला 
   सांगितले. विविध गट करून त्‍यात चर्चा आणि गप्पांमधून ग्रहांबद्‌दल प्राथमिक 
   माहिती दिली.


   त्‍यानंतर सर्व मुलांनी तयार केलेल्‍या ग्रहांना एकत्र करून संपूर्ण ग्रह मालिका 
   त्‍यांच्या त्‍यांच्या स्‍थानानुसार तयार करून घेतली. एकाच कागदावर ही ग्रह 

   मालिका दिसेल समजेल अशा पद्धतीने चिकटवून लावून घेतली.



   यानंतर मुलांनी विचारलेल्‍या प्रश्नांची अत्‍यंत समर्पक अशी उत्तरे या भूमीच्या 
   कार्यकर्ते यांनी दिली. यामुळं मुलांची उत्‍सुकता आणखी वाढली. शास्‍त्र हे 
  आपल्‍या जीवनाशी कसे जुळलेले आहे? किती सोपे आहे असा भाव सर्वांनी व्यक्‍त 
   केला.




Wednesday, 21 August 2019

१४ एप्रिल २०१९ भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम




समता प्रतिष्‍ठानने  अशी केली भिमजयंती साजरी सन - २०१९ 


दि. १४ एप्रिल रविवार या दिवशी समता प्रतिष्‍ठान संचालित अभ्‍यासिकेतील विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी एक आगळी वेगळी अशी जयंती साजरी केली.
श्री. गणेश वाघमारे यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले. 


बाबासाहेबांनी दिलेला मूलभूत शिक्षणाचा हक्‍क आणि सर्व मागासवर्गींयांना मिळवून दिलेली संधी याचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत.
एवढेच नाहीतर त्‍यांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून किती सखोल अभ्‍यास करून सर्वच भारतीयांचे भाग्‍य उजळले आहे असेही त्‍यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून अत्‍यंत सोप्या शब्‍दांत समजतील अशा गोष्‍टी श्री. गणेश वाघमारे यांनी मुलांना सांगितल्‍या.


कार्यक्रमाच्या सुरूवातीला अभ्‍यासिकेतील विद्यार्‍थ्‍यांनी भिमवंदना गाऊन बाबसाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्यांची ओळख आणि स्‍वागत श्री. रवींद्र चव्हाण यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रेखा गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे रेश्मा लेंगरे यांनी केले. सूत्र संचालन श्री. संदीप मोरे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास समता प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते मयूर खांदोडे, शुभम वेळेकर, पल्‍लवी वेळेकर, पल्‍लवी सरोदे, दिक्षा घोडके, अपर्णा चव्हाण, प्रियंका परदेशी, सुपज्ञा चव्हाण उपस्‍थित
 होते. 

समता प्रतिष्‍ठानमंगळवार पेठपुणे
संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी यांनी केले 
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन 

दि. ११, १५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्‍ठान संचालित ३ अभ्‍यासिकेतील विद्यार्थी (. ३ री ते १० वी ) यांनी महात्‍मा फुले ज्‍योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले बाबासाहेबया नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केले. संपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्‍टीरूप बाबासाहेबांच्या गोष्‍टीवर आधारित असून त्‍याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम श्री. संदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत करून केले.

मंगळवार पेठेतील भिमनगर, इंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत) येथील विद्यार्‍थ्‍यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहे. साधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.
साधारण डिसेंबर ते मार्च या कालावधीत मुलांना नाटक आणि पथनाट्‌य याची माहिती देण्यात आली. त्‍यासाठी आवश्यक काही उपक्रम घेण्यात आले. अभिनय कार्यशाळा, संवादफेक याची जुजबी माहिती मुलांना देण्यांत आली. त्‍यानंतर नाट्‌वाचन व पाठांतर असा साधारण परिपाठ करून एक महिना यावर मेहनत घेण्यात आली.
मग प्रसंग आणि नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्‍याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार सुट्‌टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्‍वरूप दिले गेले. याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं 
देखील अतिशय हृदयस्‍पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया सर्व उपस्‍थितांनी दिली.

नाटकाचा कोणताही अनुभव नसताना, कधीही रंगमंचावर न गेलेल्‍या गल्‍लीतील मुलांची अभिनयाची चुणूक पाहून सर्व नागरीक, रहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं लहानपण, त्‍यावयात त्‍यांना आलेले अनुभव, उच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभव, आणि यासर्वातून त्‍यांनी अत्‍यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठाव, संघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतो. विषमतेचे दाहक अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

भिमनगर मंडळ येथील सांस्‍कृतिक महोत्‍सावाचे उद्‌घाटन याच नाटकाच्या सादरीकरणातून करण्यात आले. भिमनगरमधील मोठ्‌या संख्येने रहिवासी, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी हे यावेळी उपस्‍थित होते.  तसेच पी.एम.सी.कॉलनी नं. २ मंगळवार पेठ येथे ही हे नाटक सादर करण्यात आले

त्‍यानंतर पारगे चौक, मंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळे, संस्‍था, संघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्‍या विधायक जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आली. संपूर्ण चौकच जणू निःशब्‍द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्‍यंत शांतपणे हे नाटक पाहत होतायावेळी याच कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आला. असा उपक्रम पहिल्‍यांदाच मंगळवार पेठेत घेतला 
असल्‍याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.

Tuesday, 30 July 2019

समता प्रतिष्‍ठान ५ वा वर्धापन दिन कार्यक्रम



समता प्रतिष्‍ठान,
(मंगळवार पेठ, पुणे)
५ वा वर्धापन दिन कार्यक्रम


दि. ३ जानेवारी २०१९ रोजी समता प्रतिष्‍ठान, पुणे या संस्‍थेला ५ वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने सर्व कार्यकर्ते यांनी अतुल पेठे यांचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला काही विद्यार्थी यांनी गीत व मनोगते सादर केली.

यामध्ये श्रेया मोरे हिने बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर वक्‍तृत्‍व सादर केले. तसेच सायली उबाळे या ८ वीतल्‍या मुलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गोष्‍टही मुलांनी इंग्रजीत सादर केली.

अतुल पेठे यांनी सर्व उपस्‍थितांना स्‍त्रियांची होणारी कुटुंबातील मानसिक कुचबंना आणि दुय्‍यम स्‍थान यावर खूप छान मांडणी केली.

त्‍याच बरोबर मुलींनी शिक्षणासाठी अत्‍यंत कष्‍ट जरी असले तरी शिक्षण पूर्ण करावे असेही सांगितले.

स्‍वच्छता, प्रामाणिकपणा आणि सचोटी असेल तुम्‍ही हवे ते यश आयुष्‍यात मिळवू शकता हे त्‍यांनी विशेष करून सांगितले.

साधारण ८० जणांची उपस्‍थिती या कार्यक्रमास होती. निता वाघमारे यांनी अतुल पेठे यांचा परिचय करून दिला. तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियंका परदेशी हिने केले. सर्वात शेवटी अभ्‍यासिकेची प्रार्थना म्‍हणून कार्यक्रमाची सांगता झाली.





Tuesday, 23 July 2019

अभ्‍यासिकांच्या १०० विद्यार्थी यांना त्‍यांच्याच पालकांच्या हस्‍ते शालेय साहित्‍य वाटप



समता प्रतिष्‍ठान सन २०१४ पासून भिमनगर, मंगळवार पेठ येथील परिसरात विविध शैक्षणिक प्रकल्‍पांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करीत आहे. व्यसनमुक्‍ती व्याख्यान, करीअर गाइडन्स, शैक्षणिक संधीबद्‌दल मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथील वस्‍त्‍यांमध्ये काम करीत आहे.

      म. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ.बा.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिक्षणाशिवाय समाजाची आणि देशीच प्रगती होऊ शकणार नाही या विचाराने प्रेरित होऊन काही समविचारी आणि शिक्षित तरूण/तरूणी यांनी एकत्रित येऊन हे काम सुरू केले आहे.



   दि. २७ जून २०१६ पासून भिमनगर मंडळ, तक्षशिला महिला मंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने व सहकार्याने एक अभ्‍यासिका भिमनगर येथे सुरू करण्यात आली. सुरूवातीला ५-१० विद्यार्थी असणारी अभ्‍यासिका आज किमान २५-३० जण नियमित विद्यार्थीची झालेली आहे.

      स्‍व-रूपवर्धिनी, पुणे मनपा कामगार युनियन यांच्या सहकार्याने आणखी ३ वस्‍त्‍यांमध्ये नवीन अभ्‍यासिका सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आल्‍या आहेत. या सर्व अभ्‍यासिकांमध्ये सरासरी २०-२५ विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. या अभ्‍यासिकेतील विद्यार्थींना दरवर्षी शालेय साहित्‍याचे वाटप समता प्रतिष्‍ठान व सेवा सहयोग या संस्‍थेच्या सहकार्याने केले जाते. याही वर्षी साधारण १०० विद्यार्थी यांना शालेय साहित्‍याचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास प्रा. विजय उर्फ धम्‍मधर गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. तसेच याच भागातील कॉंग्रेस (आय)च्या प्रभाग अध्यक्षा श्रीमती जयश्री कांबळे याही आवर्जून उपस्‍थित होत्‍या.

      यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड यांनी मुलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील व जीवनातील महत्वाच्या गोष्‍टी साध्या शब्‍दांत सांगितल्‍या. आतापासूनच शिक्षणाची कास धरल्‍यास पुढे तुम्‍हीही चांगल्‍या मार्गावरून पुढे जाल अशी आशा व्यक्‍त केली.

      यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्‍ते इ. १० वीमध्ये उत्‍तीर्ण विद्यार्थी यांचा सत्‍कार करण्यात आला. तसेच तसेच पी.एस.आय.पदी निवड झालेल्‍या कु. करूणा चव्हाण हीचा देखील  जाहीर सत्‍कार करण्यात आला. यावेळी पालक, विद्यार्थी यांनी आपले मनोगतही व्यक्‍त केले.
कु. करूणा चव्हाण हीने मुलांना अतिशय चांगल्‍या प्रकारे शिक्षणाचे महत्‍व पटवून दिले आणि तिने स्‍वतःचे काही अनुभवही मुलांसमोर मांडले.
      
       यानंतर पालकांच्या हस्‍ते १०० विद्यार्‍थ्‍यांना शालेय साहित्‍याचे वाटप करण्यात आले. त्‍यांनतर अभ्‍यासिकेचा वाढदिवस छोटया मुलांच्या हस्‍ते केक कापून साजरा करण्यात आला. शेवटी प्रार्थना घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.
      या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. रविंद्र चव्हाण (विश्वस्‍त, समता प्रतिष्‍ठान) यांनी केले. तर सूत्र संचालन अभ्‍यासिकेचीच एक विद्यार्थीनी सानिका सरोज (इ.९वी) हिने केले. तर आभार सौ.अपर्णा चव्हाण यांनी व्यक्‍त केले.
       यावेळी समता प्रतिष्‍ठानच्या अध्यक्ष सौ. अपर्णा चव्हाण, विश्वस्‍त रेश्मा लेंगरे, रवींद्र चव्हाण, संदीप मोरे, शुभम वेळेकर आणि कार्यकर्ते पल्‍लवी वेळेकर, प्रियंका परदेशी, सुप्रज्ञा चव्हाण, पल्‍लवी सरोदे, दिक्षा घोडके, मयूर खांदोडे, संतोष शर्मा हे ही उपस्‍थित होते.