समता प्रतिष्ठानने अशी केली भिमजयंती साजरी सन - २०१९
दि. १४ एप्रिल रविवार या दिवशी समता
प्रतिष्ठान संचालित अभ्यासिकेतील विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी
मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी एक आगळी वेगळी अशी जयंती साजरी केली.
श्री. गणेश वाघमारे यांनी सर्व मुलांना
मार्गदर्शन केले.
बाबासाहेबांनी दिलेला मूलभूत शिक्षणाचा हक्क आणि सर्व मागासवर्गींयांना
मिळवून दिलेली संधी याचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत.
एवढेच नाहीतर त्यांनी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून किती सखोल अभ्यास
करून सर्वच भारतीयांचे भाग्य उजळले आहे असेही त्यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या जीवनातील विविध
प्रसंग सांगून अत्यंत सोप्या शब्दांत समजतील अशा गोष्टी श्री. गणेश वाघमारे
यांनी मुलांना सांगितल्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला अभ्यासिकेतील
विद्यार्थ्यांनी भिमवंदना गाऊन बाबसाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या
सुरूवातीला पाहुण्यांची ओळख आणि स्वागत श्री. रवींद्र चव्हाण यांनी केले. तसेच
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे रेश्मा
लेंगरे यांनी केले. सूत्र संचालन श्री. संदीप मोरे यांनी केले. यावेळी या
कार्यक्रमास समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मयूर खांदोडे, शुभम वेळेकर, पल्लवी
वेळेकर, पल्लवी सरोदे, दिक्षा घोडके, अपर्णा चव्हाण, प्रियंका परदेशी, सुपज्ञा
चव्हाण उपस्थित
होते.
समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे
संचालित ३ अभ्यासिकेतील विद्यार्थी यांनी केले
बाबासाहेबांना अनोखे अभिवादन
दि. ११,
१५ व १९ एप्रिल रोजी समता प्रतिष्ठान संचालित ३ अभ्यासिकेतील
विद्यार्थी (इ. ३ री ते १० वी ) यांनी महात्मा फुले ज्योतिबा फुले व
विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती
निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘आपले बाबासाहेब’ या नाटकाचे सादरीकरण मंगळवार पेठेतील विविध भागांत केले. संपूर्ण एक तासाचे हे नाटक श्रीमती सिंधुताई शेंडे यांच्या गोष्टीरूप
बाबासाहेबांच्या गोष्टीवर आधारित असून त्याची संपूर्ण एक कलाकृती उभारण्याचे काम
श्री.
संदीप मोरे यांनी ३-४ महिने मेहनत
करून केले.
मंगळवार
पेठेतील भिमनगर, इंदिरानगर आणि पी.एम.सी.कॉ.नं.
२ (डॉ.बाबासाहेब
आंबेडकर वसाहत) येथील विद्यार्थ्यींना घेऊन हे नाटक तयार करण्यात आले आहे. साधारण ३०-३५ मुला-मुलींचा संच हे नाटक सादर करतो.
साधारण डिसेंबर
ते मार्च या कालावधीत मुलांना नाटक आणि पथनाट्य याची माहिती देण्यात आली. त्यासाठी आवश्यक काही उपक्रम घेण्यात आले. अभिनय
कार्यशाळा, संवादफेक याची जुजबी माहिती मुलांना देण्यांत
आली.
त्यानंतर नाट्वाचन व पाठांतर असा साधारण परिपाठ करून एक
महिना यावर मेहनत घेण्यात आली.
मग प्रसंग आणि
नाटकाचे रेकॉर्डिंग करून त्याची जोरदार तयारी मुलांकडून दर शनिवार आणि रविवार
सुट्टीच्या दिवशी करण्यात आली.
शेवटी मार्च व
एप्रिलमध्ये नाटकाची बांधणी आणि सादरीकरणावर भर देऊन अंतिम स्वरूप दिले गेले. याच नाटकाच्या शेवटी कवीवर्य सुरेश भटांची भिमवंदना सर्व मुलींचा गट सादर करतो. "हे गाणं
देखील अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील असं झालंय'' अशी प्रतिक्रिया
सर्व उपस्थितांनी दिली.
नाटकाचा
कोणताही अनुभव नसताना, कधीही रंगमंचावर न गेलेल्या गल्लीतील मुलांची अभिनयाची
चुणूक पाहून सर्व नागरीक, रहिवाशी आश्चर्यचकित झाले नसते तरच नवल.
बाबासाहेबांचं
लहानपण,
त्यावयात त्यांना आलेले अनुभव, उच्चशिक्षिति असूनसुद्धा जातीयतेचा चटका देणारा अनुभव, आणि यासर्वातून त्यांनी अत्यंत संयमीपणे समाजासाठी केलेला उठाव, संघर्ष हा मुलांच्या अभिनयाने जिवंत झालेला दिसतो. विषमतेचे दाहक
अनुभव पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.
भिमनगर मंडळ
येथील सांस्कृतिक महोत्सावाचे उद्घाटन याच नाटकाच्या सादरीकरणातून करण्यात आले. भिमनगरमधील मोठ्या संख्येने रहिवासी, तसेच मंडळाचे
सर्व पदाधिकारी हे यावेळी उपस्थित होते. तसेच पी.एम.सी.कॉलनी नं. २ मंगळवार पेठ येथे ही हे नाटक सादर करण्यात आले.
त्यानंतर
पारगे चौक, मंगळवार पेठ येथे देखील सर्व मंडळे, संस्था, संघटनांच्या सहयोगाने घेण्यात येणार्या विधायक
जयंती कार्यक्रमाची सुरूवात याच नाटकाने करण्यात आली. संपूर्ण चौकच
जणू निःशब्द होउन या नाटकाचा आनंद घेताना दिसत होता. साधारण ४००-५०० लोकांचा समूह यावेळी अत्यंत शांतपणे हे नाटक पाहत होता. यावेळी याच
कार्यक्रमात श्रमिकांना सन्मान करण्यात आला. असा उपक्रम
पहिल्यांदाच मंगळवार पेठेत घेतला
असल्याचे अनेकांनी आवर्जुन सांगितले.